सध्या शिक्षणाचा दर्जा लौकिकदृष्ट्या उंचावलेला आहे, असे जाणवत असले, तरी ते सत्य नाही; कारण व्यावहारिक लाभ नव्हे, तर आत्मलाभ हे आपल्या शिक्षणाचे अंतिम ध्येय आहे. पूर्वी समाजात गुरुनिष्ठा व धर्मनिष्ठा या द्वयवृत्तींचे जागरण एकाच वेळी व बरोबरीने होत असल्याने आपले राष्ट्र तेजस्वी होते; मात्र आजची शिक्षणप्रणाली ही निधर्मीवादावर व पाश्चात्त्य संस्कृतीवर आधारलेली आहे. व्यापक व चीरकालीन टिकलेली हिंदु संस्कृती सोडून पाश्चात्त्य संस्कृती अनुकरणप्रिय झाल्यामुळे आपल्या देशातील सध्याच्या शिक्षणपद्धतीचा निकृष्ट दर्जा दृष्टीसमोर येतो. निधर्मीवादाच्या नावाखाली सत्य इतिहास बदलणे, राष्ट्रपुरुषांची अवहेलना, इंग्रजीचे स्तोम माजवणे, असे अनेक अपराध सत्तांध काँग्रेसी राज्यकर्त्यांनी शिक्षणक्षेत्रात केले आहेत. परिणामी राष्ट्राची पुढील पिढी दुबळी अन् दिशाहीन होत आहे. समाजास याची जाणीव करून देणे आणि हे बदलण्यासाठी कृतीशील करणे, हा या स्तंभाचा उद्देश आहे.
निरक्षरांचा देश
भारताला स्वातंत्र्य मिळून ६१ वर्षे उलटूनही आजघडीला देशातील ४० टक्क्यांहून अधिक जनता निरक्षर आहे.
कारणे
सक्तीच्या प्राथमिक शिक्षणावर देण्यात न आलेला जोर व गरिबी ही महत्त्वाची कारणे सांगितली जातात.
प्राथमिक शिक्षण अर्धवट सोडण्याचे भयावह प्रमाण
मुंबई महापालिकेच्या शाळांमधून १९९३ ते १९९८ या ५ वर्षांच्या काळात ६५ हजारांवर विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडून बाहेर पडले, ही धक्कादायक माहिती महापालिकेच्या मुख्य लेखापालांच्या वार्षिक अहवालातूनच बाहेर आली आहे.
रोजीरोटीच्या विवंचनेतील विद्यार्थी
या विद्यार्थ्यांनी शिक्षण अर्धवट सोडण्याची अनेक सामाजिक कारणे आहेत. ही बहुसंख्य मुले गरीब स्तरातून आलेली असतात. सकाळच्या वेळी शाळा करून उरलेल्या दिवसभरात ही मुले पोटापाण्यासाठी मिळेल ती कामे करत असतात. त्यांच्या पालकांनाही त्यांच्या शिक्षणापेक्षा त्यांनी कमवून आणलेल्या पैशांचे महत्त्व जास्त असते.
रोजगारासाठी नियमित स्थलांतर करणारी कुटुंबे
स्थलांतरामुळेही प्राथमिक शिक्षणावर परिणाम होतो. कापूस गोळा करणे, उसकापणी, बांधकाम वगैरे कामांसाठी हंगामी मजूर लागतात व त्यांना कामापरत्वे त्या त्या हंगामात ठिकठिकाणी फिरावे लागते. त्यामुळे शाळेत जरी मुलांना घातले, तरी ती मुले शेवटपर्यंत शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यांना आपल्या पालकांबरोबर स्थलांतर करावेच लागते. जोपर्यंत त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटत नाही, तोपर्यंत प्राथमिक शिक्षणाची अवस्था त्यांच्याबाबतीत हीच रहाणार हे निश्चित.
अर्धशिक्षित युवकांचा देश
१८ ते २१ वयोगटातील ९४ टक्के युवकांनी शिक्षण अर्धवट सोडलेले आहे, असे मनुष्यबळ विकासखाते व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ यांनी केलेल्या एका सर्वेक्षणात आढळून आले. १५ ते २४ वयोगटातील सुमारे २० कोटी युवक असून इ.स. २०१६ पर्यंत या वयोगटातील युवकांची संख्या ५१ कोटींवर जाईल, असा अंदाज आहे. त्या वेळी या युवकांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण ४० टक्के इतके असेल.
वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे व्यवस्था अपुरी
अनेक ठिकाणी विशेषत: शहरी भागांत वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे वर्गात वैयक्तिक मार्गदर्शन व त्यांच्या अभ्यासाआड येणार्या अडचणी सोडवणे अशक्य होते. वर्गात ८० च्या आसपास विद्यार्थीसंख्या असते आणि ३५ ते ४० मिनिटांचा तास असतो. प्रत्येकाचे नाव उच्चारणे तरी शक्य आहे का ? मग वैयक्तिक लक्ष देणे, अडचणी सोडवणे यांबाबत विचारही करू नये. शिक्षक-विद्यार्थ्यांत नातेच निर्माण होत नाही. अपवाद फक्त १० टक्के हुशार, चटपटीत मुलांचा असतो.
दिशाहीन शिक्षण
वर्गात चांगले मार्गदर्शन न मिळाल्यामुळे बरीच मुले शिकवणीसाठी खाजगी शिकवण्या लावतात; पण तेथेही `संख्ये’चा प्रश्न असतोच. प्रत्येक विद्यार्थ्याच्या कुवतीनुसार त्याच्याकडून अभ्यास करून घेणे येथेही शक्य होत नाही. (वैयक्तिक पातळीवर शिकवणी ठेवणे प्रत्येकाला शक्य नसते; कारण तेथे जास्त पैसे द्यावे लागतात.) मग अशा शिकवणी वर्गामध्ये तयार टिपणे म्हणजे प्रश्नांची तयार उत्तरे, पाठांतर असते. एकूण विविध विषयांची गोडी निर्माण करणे, सखोल अभ्यासाला प्रवृत्त करणे, चिंतनाची सवय लावणे, स्वत: विचार करणे, योग्य शब्दांत विचार प्रगट करणे, हे सध्याच्या शिक्षणातून होत नाही. हल्ली परीक्षार्थी तयार होतात व एक वर्ष उत्तीर्ण होत शिक्षण करण्यापलीकडे हल्लीच्या शिक्षणाचे अन्य उद्दिष्ट दिसत नाही. शिक्षकही यातच आपले समाधान मानून घेतात. जी मुले हुशार असतात, योग्य मार्गदर्शन मिळाले तर विक्रम करू शकतात, अशा मुलांसाठीही शिक्षकांकडून मेहनत घेतली जात नाही, ही वास्तवता आहे.
- संदर्भ : सनातनचा आगामी शिक्षणविषयक ग्रंथ
बिटीश सरकारने आमच्या शिक्षणाच्या व अन्य परंपरा मोडल्याने ४० टक्क्यांहून अधिक निरक्षरता असणे !
`भारतातील शिक्षण इंग्रजी वळणाचे आहे. त्याला मार्क्सवादाची पुटे आहेत. आज जी ४० टक्क्यांपेक्षा अधिक निरक्षरता दिसते, ती आमच्या परंपरागत शिक्षणपद्धतीमुळे निर्माण झाली नाही. १९ व्या शतकात ब्रिटिश सरकारने आमच्या शिक्षणाच्या व अन्य परंपरा मोडल्या. त्यामुळे आजची निरक्षरता आहे. स्वातंत्र्योत्तर काळात ती अधोगती शिगेला पोहोचली. इंग्रजांचे शासन येण्याआधी संपूर्ण हिंदुस्थान पूर्ण साक्षर होता. त्या वेळी आमच्या परंपरा होत्या, संस्कृत होते व गुरुकुल होते. आमच्या शिक्षणपरंपरा आधुनिक जगाशी पूर्ण सुसंगत आहेत. त्यांचा पुन्हा स्वीकार करणे अपरिहार्य आहे. त्याला पर्याय नाही !’ - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
For More Information, Visit http://www.sanatan.org/marathi/dainik